सुशांत एवढा पुळका शेतकऱ्यांबाबतही घ्या – राजू शेट्टी


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुशांतसिंह राजपूत हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून हा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत एक चांगला कलाकार होता, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण जेवढी त्याच्या आत्महत्येची चर्चा होत आहे, तेवढी चर्चा दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते, अशी खंत राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेट्टी यांनी या मोर्चाच्या आधी बोलताना सुशांतसिंह प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सीबीआयकडे सुशांतच्या हत्येचा तपास देण्यात आल्यानंतर राज्यात एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर राजू शेट्टींनी तोफ डागली. हजारो शेतकऱ्यांनी तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. एवढेच काय तर अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, ऊसाबद्दल, जगण्याबद्दल का होत नाही. ज्या कामगारांची घरे लॉकडाऊनमुळे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल एवढी चर्चा झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरे वाटले असते, असे म्हणत राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी कोणाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. पण आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे. मग असे आंदोलन राजकीय नाही का, असा सवाल उपस्थित करत राजू शेट्टींनी भाजप नेत्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्षपणे राजकीय असल्याचे म्हटले. केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी देखील दूध उत्पादक प्रश्नाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचेही ते म्हणाले.