सोनू सूद विविध माध्यमातून ऐवढे लोक मागतात मदत; समोर आली आकडेवारी


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजूरांचे होणारे हाल पाहून त्यांच्या मदतीसाठी देवदूत बनून अभिनेता सोनू सूद पुढे आला होता. त्यानंतर अद्यापही तो अनेकांची विविध प्रकारे मदत करत आहे. सोनूने केवळ देशातच नव्हे तर परदेशात अडकलेल्यांची देखील मदत केली आहे. त्याचबरोबर त्याने सध्या स्थलांतरित मजूरांच्या पोटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या रोजगाराची देखील व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

विविध माध्यमातून आज देखील लोक मदतीची अपेक्षा करत आहेत. पण नेमके किती लोक मदतीची मागणी करतात, याची आकडेवारी यापूर्वी कधीच समोर आली नव्हती किंवा त्याचा कधी खुलासा देखील झाला नव्हता. पण आता याची नेमकी आकडेवारी सोनूने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून जाहिर केली आहे. एका दिवशी मदत मागणाऱ्यांची आकडेवारी पाहून लोक देखील अवाक् झाले आहेत.

सोनूने केलेल्या ट्विटनुसार त्याला दररोज ११३७ मेल, १९००० फेसबुक मेसेज, ४८१२ इन्स्टा मेसेज आणि ६७४१ ट्विटर मेसेजच्या माध्यमातून मदतीची मागणी केली जाते. एक माणूस म्हणून या सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. पण तरी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो. सोनूने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले की, माझ्याकडून जर तुमचा मेसेज मिस झाला असेल तर मला माफ करा.

दरम्यान लॉकडाऊनपासून हजारो प्रवासी मजुरांना सोनूने त्यांच्या घरी पोहोचवल्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळी मदत लोकांनी मागितली. त्याने अनेकांना पुस्तके दिली, अनेकांची फि भरली. आता तो अनेकांना रोजगार देतो आहे. त्यासाठी त्याने एक अॅपही सुरू केले आहे.