‘आता भारतासोबत थेट अणवस्त्र युद्ध’, पाकिस्तानच्या मंत्र्याची पोकळ धमकी

आपल्या विवादित वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी पुन्हा एकदा भारतासोबत अणवस्त्र युद्धाचा राग छेडला आहे. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेख रशीद यांनी दावा केला की, पाकिस्तानने आपले शस्त्र तयार ठेवले आहेत. भारताने हल्ला केल्यास आता पारंपारिक युद्ध होणार नाही तर अणवस्त्र युद्ध होईल.

अशी पोकळ धमकी देण्याची शेख रशीद यांची पहिली वेळ नाही. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, आज चीन एकटा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या विरोधात उभा आहे. पाकिस्तानने देखील चीनसोबत उभे राहायला हवे.

रशीद पुढे म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास, हे नेहमीप्रमाणे युद्ध नसेल. हे खूनी आणि अखेरचे युद्ध असेल आणि अणवस्त्र युद्ध असेल. आमचे शस्त्र अचूक निशाण्यावर आहे. आसामपर्यंत टार्गेट करू शकतो. याआधी देखील रशीद यांनी अशाप्रकारची वक्तव्य केलेली आहे. ते म्हणाले होते की, आता 4-6 दिवस टँक, तोफा चालतील किंवा विमाने, एअर अटॅक असे काही होणार नाही. आता थेट अणवस्त्र युद्ध असेल.

काही आठवड्यांपुर्वी भारताला धमकी देत ते म्हणाले होते की, पाकिस्तानकडे दीडशे आणि अडीचशे ग्रॅमचे देखील अणवस्त्र बॉम्ब आहेत. जे खास टार्गेटवर मारा करता येतात.