मुंबईच्या महापौरांवर मनसेचा गंभीर आरोप; आपल्या मुलाला दिले कोविड सेंटरचे कंत्राट


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या संकट काळात राबवलेल्या उपक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात असून फिलिपिन्स या देशात बृह्नमुंबई महानगरपालिकेने राबवलेला धारावी पॅटर्न राबवला जाणार असल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते. असे असताना दूसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटर कंत्राटात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना मनसेने या प्रकरणात लक्ष केले आहे. हे कंत्राट पेडणेकर यांनी स्वत:च्याच मुलाला दिल्याचा मनसेचा आरोप आहे. त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुत्र मोहातून शिवसेना बाहेर पडेल का, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

दादर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे आरोप केले. संदीप देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले, आमच्या असे निदर्शनास आले आहे की, आपल्या पदाचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी गैरवापर करत आपल्याच मुलाला कोविड सेंटरचे कंत्राट दिले आहे. तसेच, महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांनी गैरमार्गाने आपल्याच कंपनीकडे हे काम घेतले आहे. इतर कोणालाही न बोलावता एखादे काम परस्परच दिले जाते. त्याचे अॅग्रीमेंट कले जाते, यातच सर्व काही आले, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, कोरोना संकट हे एक युद्ध आहे. कोरोनाला या युद्धात पराभूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचे आहे. कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करत होते. या काळात इतर पक्षही आपापल्या परीने नागरिकांना अडीअडचणीत आणि लॉकडाऊन काळात मदत करत होते. सत्तेत असलेली शिवसेना मात्र त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती. आपल्या कामाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृहच चालू दिले जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत. असे असताना मुंबई महापालिकेचे सभागृहच का बंद, असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.