गणपती बाप्पांचे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी झाले आगमन


कोरोनाच्या संकट काळात यंदाच्या गणेशोत्सवाला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण यंदा आपल्या सर्वांचा आनंदोत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. विद्येची देवता अशी ओळख असलेल्या गणपती बाप्पाचे आपल्यापैकी अनेकांच्या घरी स्वागत करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूडमधील कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यातच नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दोन दिवस आधीच गणपतीचे आगमन झाले आहे. सध्या सोशल मिडियावर या गोष्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या घरातील गणेशोत्सव हा प्रत्येक वर्षी अतिशय खास असतो. शिल्पा शेट्टीचा देखील यामध्ये समावेश आहे. शिल्पाने आज मोठ्या भक्तिभावाने प्रसिद्ध लालबागच्या राजाची मूर्ती साकारणाऱ्या चिंचपोकळी येथील कांबळी बंधूंच्या कारखान्यात तयार झालेली लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली मूर्ती आणली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाप्पांची मूर्ती घेऊन येताना तिने पूर्ण सावधगिरी बाळगली होती. गणपतीची मूर्ती घरात घेताना शिल्पा शेट्टीने चेहऱ्यावर मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ह्ज घातलेले दिसून आले.

यावर्षीचा गणेशोत्सव शिल्पासाठी अतिशय खास ठरणार आहे, कारण हा उत्सव तिची मुलगी समिशाचा पहिलाच गणेशोत्सव असणार आहे. शिल्पा, तिचा नवरा राज कुंद्रा आणि मुलगा वियान दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. दरम्यान, शिल्पा शेट्टीप्रमाणेच बॉलिवूडचे अनेक स्टार्सही दरवर्षी आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. यामध्ये सलमान खान, गोविंदा, शाहरुख खान, एकता कपूर, माधुरी दीक्षित, सोनू सूद यांचा समावेश आहे. यंदाचा गणेशोत्सव जरी धुमधडाक्यात साजरा होत नसला, तरी प्रत्येकजण आपापल्या घरी हे दहा दिवस भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करणार आहेत.