सोशल मीडियात व्हायरल होत आहेत लालबागचा राजा, मुंबईचा राजा First Lookच्या नावाने खोटे फोटोज


महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे ओढावलेल्या संकटकाळात यंदा राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गणेशोत्सव आणि मुंबई असे वेगळेच समीकरण बनलेले आहे. मुंबईला 90 च्या दशकापर्यंत गिरणी कामगारांची नगरी म्हणून ओळखले जायचे.

त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत खूप धामधूम असते. यातच मुंबईतील लालबाग, परळ, चिंचपोकळी, गिरगाव या परिसरातील गणेशोत्सवाची शानच काही औरच असते. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे तो थाट आपल्या सर्वांनाच मुकावा लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याबरोबरच अनेक अटी आणि बंधने गणेशोत्सव मंडळावर घालण्यात आली आहे. त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीची ऊंचीचे देखील बंधन घालण्यात आले आहे.

याच दरम्यान देशासह विदेशात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक भान राखत यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईचा राजा म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ देखील उत्सवमुर्ती न आणता केवळ पूजेसाठी 4 फूटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. पण याच दरम्यान सोशल मीडियात विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक म्हणून काही फोटो व्हायरल होत आहेत. ते फोटो खोटे असून मुंबईचा राजा गणेश गल्लीकडून देखील अद्याप पूजा मूर्तीचेही अधिकृत फोटो शेअर करण्यात आलेले नाहीत.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना इच्छा असते. यंदा लालबागचा राजा विराजमान केला जाणार नाही. त्याऐवजी राजाच्या भक्तांसाठी लालबागमध्ये आरोग्योत्सव सुरू झाला आहे. प्लाझ्मा दान, रक्तदान शिबीराचे 3 ऑगस्टपासून आयोजन करण्यात आले आहे.