लाँच झाले कोरोनाचे आणखी एक औषध, 42 शहरात मोफत मिळणार डिलिव्हरी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसवरील औषध आणि लस शोधण्याचे काम सुरू आहे. भारतात देखील कोरोनावरील उपचारासाठी अनेक औषधांना मंजूरी देण्यात आलेली आहे. आता प्रसिद्ध फार्मा कंपनी डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजने कोरोनावरील एक औषध लाँच केले असून, कंपनीने हे औषध 200एमजी टॅबेलट स्वरूपात लाँच केले आहे.

कोरोनाच्या उपचारावर परिणामकारक ठरलेल्या फेव्हिपिराव्हिरला वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने बाजारात आणत आहेत. डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजने याचे जेनेरिक व्हर्जन बाजारात आणले असून, याला एव्हिगन नाव दिले आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने या औषधाच्या वापरास परवानगी दिली आहे.

कंपनीनुसार, एव्हिगन औषधाद्वारे हल्के आणि मध्यम लक्षण असलेल्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करता येईल. कंपनीने फ्यूजिफिल्म टोयामा केमिकल कंपनी लिमिटेडसोबत या औषधाच्या उत्पादन आणि वितरणासाठी करार केला आहे.

कंपनीने या औषधाला 122 टॅबलेटच्या पॅकमध्ये बाजारात आणले आहे. खास गोष्ट म्हणजे कंपनी देशातील 42 शहरांमध्ये या औषधाची मोफत होम डिलिव्हरी करणार आहे.  हे औषध www.readytofightcovid.in या वेबसाईटवर ऑर्डर करता येईल. परंतू कंपनीने औषधाच्या किंमतीचा अद्याप खुलासा केलेला नाही.