युजवेंद्र चहलचे मत; धोनीने कोरोनामुळे घेतली असावी निवृत्ती


नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी अशा ३ महत्वाच्या स्पर्धा जिंकवून देणारा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतली आहे. धोनीने १५ ऑगस्टच्या संध्याकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. पण धोनीने टी-२० विश्वचषकात खेळावे अशी अनेक चाहत्यांना इच्छा होती. पण धोनीने निवृत्ती जाहीर करत यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे जाहीर केले. त्यातच भारतीय संघाचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या मते धोनीने निवृत्तीचा निर्णय कोरोनामुळे घेतला असावा, असे म्हटले आहे.

आमच्या सर्वांसाठीच धोनीच्या निवृत्तीची बातमी धक्कादायक होती. माझ्यामते धोनीने हा निर्णय कोरोनामुळे घेतला असावा. नाहीतर टी-२० विश्वचषकापर्यंत धोनी खेळला असता. टी-२० विश्वचषकात त्याने अजुनही खेळावे अशी आमची इच्छा असल्याचे चहलने न्यूज18 च्या चौपाल या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करण्यासाठी चहल RCBच्या कँपमध्ये दाखल झाला आहे.

चहल यावेळी बोलत असताना म्हणाला, कुलदीप आणि मी धोनीमुळे यशस्वी झालो आहे. त्याच्याकडून आम्हाला खूप मदत मिळत होती. धोनी ज्यावेळी यष्टींमागे असायचा त्यावेळी आमचे ५० टक्के काम फत्ते झालेले असायचे. खेळपट्टी कशी आहे, पुढे ती कसे रंग दाखवेल हे धोनीचा बरोबर कळायचे. धोनी नसेल त्यावेळी या सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत. धोनीला अखेरचा सामना मिळायला हवा की नाही हे विचारले असता चहलने हा निर्णय बीसीसीआयने घ्यायचा असल्याचे सांगितले.