गांधी कुटुंबियांव्यतिरिक्त अन्य व्यक्तीने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व


नवी दिल्ली – एका पुस्तकात छापून आलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षातील नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपले मत मांडले असून यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील अशाच आशयाचे वक्तव्य केले होते. तर, राहुल यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे.

संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये प्रियंका यांनी म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या कुटुंबियांपैकी कुणीही काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, त्यांच्या या मताशी मी देखील सहमत आहे. मला हेही वाटत आहे की, आता पक्षाने आपला रस्ता निवडण्याची गरज आहे. भाजप विरोधी विचारांच्या लढाईत काँग्रेस पराभूत झाली आहे का? असा प्रश्नही प्रियंका यांना विचारण्यात आला होता. त्या त्यावर उत्तर देताना म्हणाल्या, मला वाटते की, नवीन माध्यमांना (सोशल मीडिया) समजण्यास काँग्रेसने उशीर केला. कारण, या माध्यमाचा वापर करुन पक्षाने आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली, तोपर्यंत खूप नुकसान झाले होते. गांधी कुटुंबीयांशिवाय भविष्यात जर कोणी काँग्रेसचा अध्यक्ष बनला, तर त्यांच्या आदेशाचे व निर्देशांचे आपण पालन करणार, असेही प्रियंका यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर प्रियंकांनी या मुलाखतीत पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कौटुंबिक स्वास्थ बिघडले असून आपल्या दोन्ही मुलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही म्हटले आहे. जेव्हा माझ्या पतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्यावेळी माझ्या 13 वर्षीय मुलाला मी सर्व बाजू समजावून सांगितल्या. मी त्यास सर्व व्यवहार दाखवले. माझ्या मुलीलाही तेच सांगितले. मी माझ्या मुलांपासून काहीच लपवत नाही, आपल्या चुका व कमजोरी हेही त्यांच्यासोबत शेअर करत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.