श्री ज्ञानेश्‍वरांचा वाङ्मयमूर्ती श्री गणेश


श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरीचे लेखन सुरू करताना प्रथेप्रमाणे श्री गणेशाला वंदन केले आहे. अनेक ग्रंथकारांनी ही प्रथा पाळलेली आहे आणि आपल्या ग्रंथाचा प्रारंभ गणेश वंदनेनेच केलेला आहे. परंतु ज्ञानेश्‍वर हे असामान्य काव्यप्रतिभा लाभलेले महान कवी होते. त्यांनी गणेश वंदन केले आहे, पण गणपती ही देवता वाङ्मयमूर्ती आहे असे कल्पून गणपतीचे विविध अवयव म्हणजे वाङ्मयाचे विविध आविष्कार कसे आहेत हे दाखवून दिले आहे.

ॐ नमो जी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वयंवेद्या | आत्मरूपा ॥

हे ॐकारस्वरूप परमात्मा ! वेदांनाच ज्यांचे प्रतिपादन करता येते, अशा तुला मी नमस्कार करितो. केवळ स्वानुभवानेच ज्यांचे ज्ञान होऊ शकते, अशा आत्मस्वरूपा ! मी तुझा जयजयकार करितो.

देवा तूंचि गणेशु | सकलार्थमतिप्रकाशु | म्हणे निवृत्तिदासु | अवधारिजो जी ॥

देवा, सर्वांच्या अर्थग्रहणशक्तीचा प्रकाश जो गणेश, तो तूंच आहेस, असे हा श्रीनिवृत्तिनाथांचा नम्र शिष्य प्रतिपादीत आहे, ते सावधपणे ऐकावे.

हे शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष | तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ॥

हे संपूर्ण वाङ्मय तुझी मनोहर मूर्ति असून, तिचे अक्षररूप शरीर निर्दोषपणे झळकत आहे.

स्मृति तेचि अवयव | रेखा आंगीकभाव | तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ॥

स्मृती हेच (या मूर्तीचे) अवयव, काव्यपंक्ति हेच त्या अवयवांचे हावभाव आणि अर्थसौंदर्य हीच लावण्याची ढब होय.

अष्टादश पुराणें | तींचि मणिभूषणें | पदपद्धती खेंवणें | प्रमेयरत्नांची ॥

अठरा पुराणे हेच रत्नजडित अलंकार होत आणि तत्त्वसिद्धांत ही रत्ने असून, शब्दांची जडण ही रत्नांची कोंदणे झाली आहेत.

पद्मबंध नागर | तेंचि रंगाथिलें अंबर | जेथ साहित्य वाणें सपूर | उजाळाचें ॥

सभ्य व सुंदर काव्यप्रबंध हेच रंगीबेरंगी वस्त्र होय आणि या वस्त्रांचे साहित्यरूपी सणंग मोठे पल्लेदार व तकतकीत आहे.

देखा काव्य नाटका | जे निर्धारितां सकौतुका | त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनि ॥

आणखी पहा की, या काव्यनाटकांची रसिकपणे योजना केली तर त्यांचे घुंगूर होतात व ते अर्थरूपी ध्वनीची रुणझुण सुरू करतात.

नाना प्रमेयांची परी | निपुणपणें पाहतां कुसरी | दिसती उचित पदें माझारीं | रत्नें भलीं ॥

आणि (या काव्यनाटकांतील) तत्त्वसिद्धांतांची मोठ्या चाणाक्षपणाने छाननी केली, तर त्यांत जी मार्मिक पदे आढळतात. तीच (घुंगुरांवरची) रत्नें होत.

तेथ व्यासदिकांच्या मती | तेचि मेखळा मिरवती | चोखाळपणें झळकती | पल्लवसडका ॥

आणि व्यासदिक कवींचा जो प्रतिभागुण, तोच शेल्याचा कंबरबंध होय आणि या शेल्याच्या पदराचे सोगे (या घुंगुरांच्या) वरच्या बाजूस झळकत असतात.

देखा षड्दर्शनें म्हणिपती | तेचि भुजांची आकृति | म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधें हातीं ॥

आणि ज्या सहा भिन्नभिन्न तत्त्वसंप्रदायांना षड्दर्शने म्हणतात, तेच (या गणेशमूर्तीचे) सहा हात आहेत, याच कारणास्तव (या संप्रदायांच्या मतभेदानुसार) या सहा हातांतील आयुधेही परस्परांशी विसंवादी अशी आहेत.

Leave a Comment