कोट्यावधी खातेधारकांना एसबीआयचे गिफ्ट, ‘या’ सेवांवरील शुल्क केले रद्द

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने ग्राहकांना आकारले जाणारे शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बँलेंसच्या शुल्काचा समावेश आहे. एसबीआयच्या 44 कोटी खातेधारकांना याचा फायदा होईल.

एसबीआयने निर्णय घेतला आहे की ग्राहकांकडून एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बँलेंसचे शुल्क आकारले जाणार नाही. या सेवा मोफत दिल्या जातील. सोबतच इतर अ‍ॅप्सच्या ऐवजी #YONOSBI डाऊनलोड करावे. बँकेने ग्राहकांना खात्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर बँकिंग सर्व्हिसेज मेसेजसाठी लागणारे शुल्क आता रद्द केले आहे. आता अतिरिक्त मिनिमम बँलेंस ठेवणे देखील गरजेचे नाही.

याआधी एसबीआयच्या ग्राहकांना खात्यात कमीत कमी 3000 रुपये रक्कम ठेवावी लागत असे. रक्कम 50 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास 10 रुपये व त्यावरील जीएसटी असे शुल्क भरावे लागत असे.

दरम्यान, एसबीआयने काही दिवसांपुर्वीच एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. आता ग्राहक केवळ 8 वेळा मोफत पैसे काढू शकतील. तसेच एटीएममधून पैसे काढताना, खात्यात पैसे नसल्यामुळे व्यवहार रद्द झाल्यास ग्राहकांना 20 रुपये व जीएसटी असे शुल्क भरावे लागेल.