मोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर

दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्याने निवृत्ती जाहीर केली. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पंतप्रधान मोदी हे दोन्ही आगामी वर्ल्ड कप खेळण्यास सांगू शकतात असे म्हटले आहे.

अख्तर आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला की, मला वाटते धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो. ज्या प्रकारे भारत आपल्या स्टार्सला सन्मान देतो, त्यांना ओळख देतो, ते पाहून असे वाटते की धोनी टी-20 वर्ल्ड कप नक्कीच खेळायला लावला असता, मात्र शेवटी हा खेळाडूचा निर्णय आहे.

अख्तर म्हणाला की, धोनीने सर्व काही जिंकले आहे. रांचीवरून आलेल्या एका खेळाडूने सर्व भारताला आनंद दिला. आणखी काय हवे. भारतासारखा देश हे कधीच विसरणार नाही. अख्तर म्हणाला की, भविष्यात धोनी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवर परतू शकतो. तुम्ही काही सांगू शकत नाही. मोदी त्याला फोन करून टी-20 वर्ल्ड कप खेळण्यास सांगू शकतात.

अख्तर म्हणाला की, तुम्ही पंतप्रधानांना नाही म्हणू शकत नाही. मला वाटते की भारताच्या पंतप्रधानांनी धोनीला 2021 टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी विनंती करायला हवी. भारताने धोनीला एक फेअरवेल द्यायला हवा.