सलाम! मजूर बापाचा मुलाला परीक्षा देता यावी म्हणून सायकलने 105 किमी प्रवास

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील कामगार असलेले शोभाराम यांनी आपल्या मुलाला परीक्षा देण्यासाठी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचवण्यासाठी तब्बल 105 किमी सायकल चालवल्याची घटना समोर आली आहे. मध्ये प्रदेशमध्ये ‘रुक जाना नही’ या अभियानांतर्गत 10वी आणि 12वी परीक्षेत अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आणखी एक संधी दिली जात आहे. या अंतर्गतच मंगळवारी गणिताचा पेपर होता.

शोभाराम यांचा मुलगा आशिषला 10वीचे तीन विषयांचे पेपर द्यायचे होते. परीक्षा केंद्र त्यांच्या घरापासून 105 किमी लांब होते. कोरोना महामारीमुळे सर्वकाही बंद होते. अशात मुलाला वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी शोभाराम सोमवारी रात्री 12 वाजताच सायकल घेऊन निघाले. धार येथे त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी 3 दिवसांचे जेवण देखील आपल्यासोबत घेतले होते. ते मंगळवारी परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिटे आधी केंद्रावर मुलाला घेऊन पोहचले. आता पुढील दोन दिवस मुलाचे पेपर असल्याने ते तेथेच थांबणार आहेत.

शोभाराम यांनी सांगितले की, मी मजूर आहे. मात्र मुलाला असे दिवस पाहू देणार नाही. मी मजूर असलो तरी मुलाने अधिकारी व्हावे हे स्वप्न आहे. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शक्य होईल ते प्रयत्न करेल. जेणेकरून मुलगा एक चांगले आयुष्य जगू शकेल. मुलगा हुशार आहे, मात्र कोरोनामुळे व्यवस्थित शिक्षण होऊ शकले नाही. क्लास लावू शकलो नाही. गावात शिक्षक देखील नाही. त्यामुळे त्याचे तीन विषय राहिले. मी शिकलेलो नसल्याने काहीही करू शकलो नाही.

मुलाला परीक्षा देता यावी म्हणून त्यांनी सायकलने 105 किमीचा प्रवास केला. रस्त्यात काही अडचण येऊ नये म्हणून 500 रुपये देखील उधारी घेतले. रस्त्यात काहीवेळा आराम देखील केला. मात्र उशीर होईल या भितीने आराम देखील विसरलो. अखेर मुलाला शाळेत प्रवेश करताना पाहून थकवा दूर झाला, असे ते म्हणाले.