जम्मू-काश्मिरमधून निमलष्करी दलाच्या 100 कंपन्यांना परत बोलवण्याचा गृह मंत्रालयाचा निर्णय

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या 100 कंपन्यांना तत्काळ परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. या 100 कंपन्यांमध्ये 40 सीआरपीएफच्या, 20 बीएसएफ, 20 एसएसबी आणि सीआईएसएफच्या 20 कंपन्या केंद्र शासित प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मिरमधून जवळपास 10000 निमलष्करी दलाच्या जवानांना त्वरित परत बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाने सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सच्या (सीएपीएफ) तैनातीचे समीक्षा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

100 निमलष्करी दलाच्या कंपन्यांना माघार बोलवत त्यांना आपआपल्या निर्धारित स्थानांवर परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मिरला लागू असलेले कलम 370 हटवल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसाठी या जवानांना तैनात करण्यात आले होते. सीएपीएफच्या एका कंपनीमध्ये जवळपास 100 जवान असतात.