Good News! स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला आजपासून होणार सुरूवात


नवी दिल्ली – एकीकडे देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने चिंताजनक वाढ होत असतानाच दूसरी केड देशवासियांना सुखद धक्का देणारी एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात आजपासून पहिल्या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात येणार असून यासंदर्भातील माहिती एका पत्रकार परिषदेत मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिली होती.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वदेशी कोरोना प्रतिबंधल लसीसंदर्भातील माहिती देण्यात आली. नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांनी यावेळी सांगितले, की देशात सध्या तीन लसींवर काम सुरू आहे. या सर्व लसी चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. त्यांनी यावेळी अशी माहिती दिली होती, की या तीन लसींपैकी एका लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला आज किंवा उद्यापासून सुरूवात होईल. पण त्यांनी त्या लसीच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. तसेच इतर दोन लसी प्रत्येकी चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत.

सध्या देशात, भारत बायोटेक-ICMR च्या कोवॅक्सिन (Covaxin), झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी (Zykov-D) आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्‍ड (Covishield) या तीन लसी चाचण्यांच्या विविध टप्प्यांवर असून कोविशिल्डची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सीरम इंस्टिट्यूटद्वारे केली जाणार आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून भारतात तीन लसींवर काम सुरू असल्याची माहिती दिली होती.