धोनीच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, निरोपाचा सामना आयोजित करणार बीसीसीआय


देशाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाची बाब असते, पण याच दिवशी एक धक्का देणारी बातमी क्रीडाविश्वातून आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेट रसिकांना मोठा धक्का दिला. धोनीच्या निवृत्तीची चर्चा विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतरच सुरु झाली होती, पण धोनी मैदानाबाहेर निवृत्त होईल, असा विचार कुणी ध्यानी मनी केला नसेल. पण, आता त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. धोनीचे भारतीय क्रिकेटमध्ये असलेले महत्वपूर्ण योगदान लक्षात घेता बीसीसीआय त्याच्या निरोपाचा सामना आयोजित करण्याचा विचार करत आहे.

आयसीसीच्या एकदिवसीय, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. टीम इंडियाने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान धोनीच्या नेतृत्वाखालीच मिळवले. ऑस्ट्रेलियाला कसोटीत 40 वर्षांत कुणी व्हाईटवॉश दिला नव्हता, तो विक्रम टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली नोंदवला. त्याचबरोबर त्याच्या नावावर अनेक जागतिक विक्रमांची नोंद आहे. अशा या विक्रमादित्य धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करायलाच हवा, अशी मागणी सध्या सर्वच माध्यमांमध्ये जोर धरत आहे.

बीसीसीआय चाहत्यांचा भावनांचा आदर राखताना, धोनीसाठी निरोपाच्या सामन्याचे आयोजित करण्याचा विचार करत आहे. याबाबत आयएएनएस या वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय मालिका नाही, परंतु आयपीएलनंतर आम्ही काय करू शकतो, याचा विचार करत आहोत. भारतीय क्रिकेटसाठी धोनीचे योगदान अमुल्य आहे आणि तो सन्मान त्याला मिळायलाच हवा. निवृत्तीचा सामना त्याने खेळावा, अशी आमचीही इच्छा होती. पण, धोनी वेगळा खेळाडू आहे आणि कोणाच्या ध्यानी मनी नसताना त्याने निवृत्तीची घोषणा केली.

धोनीशी निवृत्तीच्या सामन्याबद्दल काही चर्चा झाली आहे का, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, अद्याप पर्यंत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, पण आम्ही आयपीएलदरम्यान त्याच्याशी चर्चा करणार आहोत. तेथे त्याचे मत जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी निरोपाचा सोहळा आयोजित केला जाईल, आता तो त्यासाठी तयार होईल की नाही, यावर सर्व अवलंबून आहे. त्याचा सन्मान करणे हे आमचे भाग्यच आहे.