थायलंडमधील गणपती


थायलंड देशात गणेश पूजनाची प्रथा फार प्राचीन काळापासून आहे. येथे गणपती ही यशाची आणि भाग्याची देवता म्हणून जशी पुजली जाते त्याचप्रमाणे गणपती हा विघ्नहर म्हणूनही पुजला जातो. थायी लोक गणपती पूजन करताना मूर्तीभोवती सुंदर सजावट करतात तसेच गणेशाला लाल फुल आवर्जून वाहतात. कारण त्यांनाही गणेशाला लाल फुल प्रिय आहे हे माहिती आहे. कोणत्याही शुभ कार्याचा मुहुर्त येथे गणपती पूजनानेच केला जातो. थायलंडमध्ये सहावा आणि आठवा राम या हिंदू राजांच्या काळात अनेक गणेशमंदिरे बांधली गेली आहेत.

थायलंड हा वास्तविक बौद्धधर्मिय बहुसंख्य असलेला देश. मात्र बुद्ध हाही भारताचाच. त्यामुळे येथे हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा सुंदर मिलाप झालेला आहे. गणेशाचा संबंध या देशात कला, शिक्षण आणि व्यापाराशीही आहे. येथील फाईन आर्टस विभागाचे बोधचिन्ह गणपती आहे. संपूर्ण थायलंडमध्ये गणेशाची अनेक देवळे आहेत. इतकेच नव्हे तर मोठे टिव्ही चॅनलची मुख्यालये, मोठी व्यापारी सेंटर्स यांच्या इमारतींच्या दारातही गणेश मंदिरे आहेत. सेंट्रल बँकाँक मधील रॉयंल ब्राह्मीन टेंपल मधील गणेशमूर्ती सुंदर आहे. याचा भागात संग्रहालयातील १० व्या शतकातील ब्रॉन्झची गणेशमूर्ती हातात तमीळ आणि थाई हस्तलिखिते घेतलेली आहे.

सिलोम येथील हिंदू मंदिर वटफ्रा श्री उमादेवी येथील गणेशमूर्ती १९ व्या शतकातली असून ती भारतातूनच तिकडे नेली आहे. थाई बौद्ध गणेशाची प्रार्थना करतात. येथे गणेशाला मोदक , मिठाईचा नैवद्यही दाखविला जातो. फळे अर्पण केली जातात. उदबत्ती लावली जाते. येथील एक मजेशीर प्रथा अशीही आहे की गणेश ही व्यवसायाची देवताही मानली गेल्याने व्यवसाय चांगला चालला तर गणेश मूर्ती नेहमीच्या पद्धतीने ठेवलेली असते मात्र जर व्यवसायात खोट आली तर हीच मूर्ती उलटी करून ठेवली जाते.

गणेश डिप्लोमसी लॉर्ड म्हणूनही येथे पुजला जातो. त्यामुळे साधारणपणे उंच चौथर्‍यावर त्याची स्थापना केलेली आढळते. राजधानी बँकॉक येथील सेंट्रल वर्ल्ड ( वर्ल्ड ट्रेड सेंटर) मथ्ये अशीच उंच चौथर्‍यावर गणेश मूर्ती विराजमान असून त्याची नित्यनेमाने ताजी फुले आणि उदबत्त्या लावून पूजा केली जाते. बँकाकमध्येच एका हातात हस्तलिखित पोथी आणि दुसर्‍या हातात तुटलेला दात घेतलेली गणेश मूर्ती असून त्याचा संदर्भ महाभारत लिहून घेणारा गणेश याच्याशी आहे. थायलंडध्ये साधारण सातव्या शतकापासूनच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात. बँकॉक नॅशनल म्युझियममध्येही अशा अनेक मूर्ती आहेत. आयुद्या शहरातही गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

Leave a Comment