बलात्कारातील आरोपीच्या ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा’चे गणेश चतुर्थीला उद्घाटन

अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या स्वयंघोषित नित्यानंद स्वामीने काही महिन्यांपुर्वी कैलासा नावाने स्वतःचा देश स्थापन केला होता. आता हा स्वंघोषित स्वामी गणेश चतुर्थीच्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ कैलासाचे उद्घाटन करणार आहे. ही बँक इक्वाडोरच्या तटावरील एका बेटावर उघडण्यात आली आहे. स्वामी नित्यानंदचा एक व्हिडीओ समोर आला असून, यात तो बँकेबाबत माहिती देत आहे.

व्हिडीओमध्ये नित्यानंद सांगत आहे की त्याच्या देशाने आणखी एका देशासोबत एमओयूवर स्वाक्षरी केली आहे. गणपतीच्या कृपेने गणेश चतुर्थीच्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ कैलासाचे उद्घाटन करणार आहोत व चलनाचा देखील खुलासा करू. नित्यानंदने दक्षिण अमेरिकेत कैलासा नावाने आपला देश स्थापन केला आहे.

व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की बँकेसाठी संपुर्ण आर्थिक धोरण, 300 पानांची कागदपत्रे, चलन पुर्णपणे तयार आहे. आर्थिक धोरणे, अंतर्गत चलनाचा वापर आणि बाह्य जागतिक चलन विनिमय हे सर्व कायदेशीररित्या केले गेले आहे. कैलासाच्या वैबसाईटनुसार, हे जगातील सर्वात मोठा डिजिटल हिंदू राष्ट्र आहे. इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ या तीन अधिकृत भाषा असून, राष्ट्रीय पक्षी, प्राणी, प्रतिक, वृक्ष आणि फूलासह ध्वज देखील निश्चत केलेला आहे.

दरम्यान, बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बाबा नित्यानंद मागील अनेक महिन्यांपासून फरार आहे. सरकारने त्याचा पासपोर्ट देखील रद्द केला आहे. इंटरपोलने देखील त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.