फेसबुकची चेतावणी; ट्रम्प यांनी द्वेषपूर्ण भाषण किंवा चुकीची माहिती पोस्ट केल्यास ती तात्काळ डिलीट करु


वॉशिंग्टन – सोशल मीडियातील अग्रेसर असलेल्या फेसबुकने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका पाहता थेट चेतावणी दिली आहे. कंपनीचे मानके ट्रम्प यांनी तोडल्यास त्यांची पोस्ट कंपनीकडून तात्काळ डिलीट करण्यात येईल, असे फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सँडबर्ग यांनी सांगितले. सँडबर्ग एमएसएनबीसीशी बोलताना म्हणाल्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जर द्वेषयुक्त भाषण किंवा कोरोनाबद्दल कोणतीही चुकीची माहिती पोस्ट अथवा शेअर करत असतील, तर त्या पोस्ट तात्काळ हटवल्या जातील.

फेसबुकवर 2016 साली अमेरिकेमध्ये झालेल्या निवडणुकींच्या काळात अनेक आरोप लावण्यात आले होते. परदेशी सैन्याने फेसबुकच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण फेसबुक आता कठोर पावले उचलत आहे. फेसबुकने गेल्या आठवड्यात निवडणुकांच्या बाबतीत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी ‘वोटिंग इन्फार्मेशन सेंटर’ सुरू केले आहे. अमेरिकेतील लोकांना या माध्यमातून मतदानाविषयी योग्य माहिती मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे सेंटर फेसबुकसोबतच इंस्टग्रामवरही उपलब्ध आहे.

ट्रम्प यांच्या पोस्टवर आक्षेप न घेतल्यामुळे आणि कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे जाहिरातदारांनी फेसबुककडे पाठ फिरवली होती. या विरोधात कंपनीचे कर्मचारीही आवाज उठवायला लागले होते. यानंतर कंपनीने द्वेषपूर्ण भाषण आणि चुकीच्या बातम्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या हस्तक्षेपाला सामोरे जाण्यासाठी जगातील काही प्रगत यंत्रणा तयार केल्या आहेत आणि त्या सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतातही फेसबुक वादात आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, फेसबुक हे सत्ताधारी पार्टी भाजपचे समर्थन करते.