वाईचा ढोल्या गणपती


सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत टुमदार गांव वाई तेथील अनेक घाट, मंदिरे यामुळे प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी विराटनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गावाला दक्षिणेची काशी म्हणूनही संबोधले जाते. कृष्णा नदीच्या काठावर बसलेले हे गांव जसे घाट आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तसेच चित्रपटांसाठी उत्तम लोकेशन म्हणूनही नावास आले आहे. विश्वकोशाची निर्मिती करणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे गांव आहे.

पेशव्यांचे सरदार रास्ते यांनी कृष्णेवरचे हे सुंदर घाट बांधल्याचे सांगितले जाते. गणपती घाटावरील प्रचंड आकाराचा गणपती हे या गावाचे खास वैशिष्ठ्य आहे. आकारामुळे ढोल्या गणपती या नावानेच हा गणपती ओळखला जातो.

या छोट्याशा गावात सात घाट आहेत आणि या घाटांवर असंख्य मंदिरे आहेत. या गावात कृष्णाबाईचा उत्सव प्रत्येक घाटावर साजरा केला जातो. असे सांगतात की प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी विजापूरचा सदरार अफझलखान प्रथम याच गावात तळ ठोकून राहिला होता. तेव्हा येथील शेंडेशास्त्री यांनी शिवाजी राजांचा जय होऊदे तुझा उत्सव करीन असा नवस केला आणि कृष्णेची प्रार्थना केली. कृष्णा प्रसन्स झाली, अफझलखान मारला गेला आणि कृष्णाबाईचा उत्सव सुरू झाला तो आजतागायत केला जातो.

या घाटांवर हेमाडपंथी शैलीतील अनेक मंदिरे आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे ढोल्या गणपती मंदिर. हे मंदिर १७६२ साली शिलाहार घराण्याचा राजा भोज याने शहराच्या संरक्षक देवता म्हणून बांधले.१० वर्षे या मंदिराचे बांधकाम सुरू होते आणि त्यासाठी त्याकाळी दीड लाख रूपये खर्च आला होता. मंदिरातील १० फूट उंच आणि ८ फूट रूंदीची गणेश मूर्ती अतिशय विलोभनीय आहे आणि ती अखंड कातळातून कोरली गेली आहे. देवळाचे पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून हे मंदिर माशाच्या आकारात बांधले गेले आहे.

या शिवाय चक्रेश्वर, चिमणेश्वर, कुंटेश्वर, काळेश्वर, कृष्ण मंदिर, गणपती, विठ्ठल, दत्त, बहिरोबा, महादेव, विष्णु, हनुमान अशी बहुतेक सर्व हिंदू देवतांची मंदिरे वाईत आहेत.याच गावात १०५ वर्षांची जुनी गोवर्धन संस्था आहे.

Leave a Comment