ऑनलाईन औषध बाजारात वर्चस्वासाठी युद्ध, रिलायन्स-अ‍ॅमेझॉन तयारीत

भारतात ऑनलाईन औषधांचा बाजार वेगाने वाढत चालला आहे. मोठमोठ्या कंपन्या या बाजारात पाऊल ठेवत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने नेटमेड्समध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी केली आहे. तर अ‍ॅमेझॉनने बंगळुरूमधून ई-फार्मेसी व्यवसायाला सुरुवात केली आहे. आता फ्लिपकार्ट देखील या बाजारात उतरण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षात भारतीय औषध बाजारात देशी-विदेशी कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. रिलायन्सने ऑनलाईन फार्मेसी कंपनी नेटमेड्समध्ये 620 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे. रिलायन्सने विटालिक हेल्थ आणि सब्सिडियरी कंपन्यांमध्ये जवळपास 60 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे.

मागील आठवड्यात अ‍ॅमेझॉनने देखील बंगळुरूमध्ये अ‍ॅमेझॉन फार्मेसी लाँच केली आहे. कंपनी येणाऱ्या पुढील काही महिन्यात दुसऱ्या शहरांमध्ये देखील आपली ही सेवा सुरू करणार आहे. कंपनी औषधांवर 20 टक्के सुट देत आहे. कंपन्यांच्या या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा मिळू शकतो. रिलायन्स आणि अ‍ॅमेझॉनमध्ये आता एकप्रकारे ऑनलाईन औषध बाजारात युद्ध सुरू झाले आहे.

दुसरीकडे फ्लिपकार्ट देखील फार्मईजी सोबत भागीदारी करण्यासाठी चर्चा करत आहे. फार्मईजी बंगळुरूच्या मेडलाईफ या फार्मेसी कंपनीला खरेदी करण्याची देखील शक्यता आहे. भारतात ई-फार्मा इंडस्ट्री जवळपास 9 हजार कोटी रुपयांची असून, पुढील 5 वर्षात हा बाजार 1.20 लाख कोटींवर पोहचण्याची शक्यता आहे.