कोट्यावधी तरुणांसाठी केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय; नॉन गॅझेट सरकारी आणि पब्लिक सेक्टर बॅंकेमधील पदांसाठी एकच परीक्षा


नवी दिल्ली – आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार राष्ट्रीय भरती एजन्सीला (NRA) केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा यापूर्वी तरुणांना घ्याव्या लागत होत्या, पण आता निर्णयामुळे केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

20 भरती एजन्सी देशात आहेत, म्हणून विविध विविध ठिकाणी प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. कोट्यावधी तरुणांना याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी करण्यात येत होती.

राष्ट्रीय भरती एजन्सी आता तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. परीक्षा देण्यासाठी आता धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.