करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या, कंगणाची मागणी


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यातच या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या निर्माता दिग्दर्शक करण जोहरवर अनेक कलाकारांनी घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यातच आता कंगणाने तिच्या रडारावर असलेल्या करण जोहरला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या अशी मागणी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून कंगणा सतत करण जोहरवर टीकास्त्र डागत असून आता तिने केलेल्या मागणीमुळे अनेकांचे लक्ष तिने पुन्हा एकदा आपल्याकडे वेधले आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कंगनाने करण जोहरला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी केली आहे. सोबतच करणने मला धमकी दिल्याचेही सांगितले आहे. दरम्यान करणने मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बोलताना मी कलाविश्व सोडून द्यावे, असेही म्हटले होते. सुशांतसोबत सुद्धा असाच कट रचण्यात आला आहे. उरी हल्ला झाला त्यावेळी देखील त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेतला पाहिजे, असे कंगणा म्हणाली.