फिलिपीन्सने घेतली ‘धारावी पॅटर्न’ची दखल; देशात राबवणार तसाच पॅटर्न


मुंबई: कोरोनाच्या संकट काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाचे केंद्र बिंदू म्हणून समोर आली होती, त्यातच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीने कोरोनावर यशस्वीरित्या मात करत संपूर्ण जगासमोर कोरोना मुक्तीचा पॅटर्न ठेवला आहे. त्याचबरोबर धारावीत राबवलेल्या उपाययोजनांचे जगभरातून कौतुक झाले आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या धारावी पॅटर्नचे जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी भरभरुन कौतूक केल्यानंतर आता आपल्या देशातही धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय फिलिपीन्स सरकारने घेतला असून त्यांनी मुंबई महापालिकेशी त्यासाठी संपर्क साधला आहे.

फिलिपीन्समध्येही धारावीप्रमाणेच लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे धारावी पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात फिलिपीन्स सरकार आहे. यासाठी फिलिपीन्स सरकारने संपर्क साधल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. चेस द व्हायरस मोहीम आम्ही राबवली. ही मोहीम विषाणूचा पाठलाग करून त्याला लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीने राबवण्यात आली. ही मोहीम आता फिलिपीन्स सरकारलादेखील राबवायची असल्यामुळे त्यांना योजनेचा आराखडा आम्ही दिला असल्याचे चहल यांनी सांगितले.

अतिशय सोपे आणि सुटसुटीत असे धारावी पॅटर्न असल्याचे चहल म्हणाले. सर्वात आधी तपासण्या करा. फैलाव झाला असल्यास लगेच क्वारंटीन व्हा, हेच पॅटर्न धारावीत राबवण्यात आले. लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी दिली. धारावीत आता कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर धारावीत कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढली आहे. आधी एका दिवसात ४ हजार कोरोना चाचण्या व्हायच्या. आता तिथे १२ हजार चाचण्या केल्या जातात.

धारावीतील कोरोना प्रादुर्भावाचा दर ०.८ एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के एवढे आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ४.८ टक्क्यांवर आला आहे. सध्या धारावीतील ५ हजार ३८८ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. धारावीत अतिशय दाटीवाटीने लोक राहतात. त्यामुळे संक्रमणाची शक्यता अतिशय जास्त आहे. अशा परिस्थितीतही धारावीतील परिस्थिती मुंबई महानगरपालिकेने नियंत्रणात आणली आहे.

यासंदर्भात फिलिपीन्समधील वृत्तसंकेतस्थळ इनक्वायररने दिलेल्या वृत्तानुसार, धारावी पॅटर्न उत्तम असल्याचे फिलिपीन्सच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. धारावीपेक्षा जास्त फिलिपिन्समधील लोकसंख्येची घनता असल्यामुळे धारावी पॅटर्न प्रभावी ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. धारावीत २.५ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात १० लाख लोक राहतात म्हणजेच प्रति ९ वर्ग मीटरमध्ये ८ ते १० जण राहतात, अशीच काहीशी परिस्थितीत फिलिपीन्समध्ये आहे.