खडतर व्रत हरतालिका


भाद्रपदातील वद्य तृतीयेला भारताच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. ही पूजा म्हरजे पार्वतीची पूजा आहे. तीन दिवस चालणारे हे व्रत महिलांसाठीचे व्रत असून ते अतिशय खडतर मानले जाते.

पुराणातील संदर्भाप्रमाणे हिमालयाची कन्या पार्वती हिचे शंकरावर प्रेम जडले. मात्र शंकराला त्याची कल्पनाच नव्हती. शंकर हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने हिमालयात खडतर तपश्चर्या सुरू केली. सतत १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने ही उपासना केली व अखेर शंकर तिच्या व्रताने प्रसन्न झाला आणि तिचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला.

भारताच्या अनेक राज्यात केले जाणारे हे व्रत मुख्यत्वे हिंदू समाजात केले जाते. हे व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. या दिवशी पार्वती आणि तिची सखी याच्या मातीच्या मूर्ती घरी आणून सुशोभित केलेल्या चौरंगावर त्यांची स्थापना केली जाते. नंतर महिला व मुली एकत्र येऊन त्यांची पूजा करतात. यावेळी वाळूचे शिवलिंग तयार केले जाते. पंचामृती पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो.फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते.

या दिवशी संपूर्ण दिवस उपास करण्याची प्रथा आहे. कांही महिला पाणीही न पिता हा उपवास करतात. कुमारिका चांगला नवरा मिळावा व विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे व संसार सुखाचा व्हावा अशी प्रार्थना मनोभावे करतात. रात्री विविध खेळ खेळून रात्र जागविली जाते. दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखविला जातो व या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यानंतर उपास सोडला जातो. पक्वानांचे भोजन केले जाते याला पारणे असे म्हणतात.

हे व्रत महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा थोडी वेगळी असली तरी शिवपार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते.

Leave a Comment