आता जगभरात पोहचणार सॅमसंगचे Made In India स्मार्टफोन


नवी दिल्ली – सध्या जगभरातील स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या बहुतांश दिग्गज कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवल्याचे चित्र दिसत आहे. स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल काही आठवड्यांपूर्वीच चीनमधील आपले बस्तान गुंडाळून आपला उद्योग भारतामध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करत असल्यासंदर्भातील वृत्त आम्ही तुम्हाला दिले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता आता मूळची दक्षिण कोरियन सॅमसंग ही स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनीनेही भारतामध्ये आपले परदेशातील उद्योग हलवण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे.

यासंदर्भातील वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सॅमसंग त्यांच्या व्हिएतनाममधील सध्याच्या स्मार्टफोन निर्मितीचा मोठा हिस्सा भारताबरोबरच अन्य काही देशांमध्ये स्थलांतरित करणार आहेत. भारतामध्ये ४० बिलीयन डॉलर्सचे म्हणजेच ३ लाख कोटींचे स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी सॅमसंग युनिट सुरु करण्यासंदर्भातील हालचाली करत आहे.

इकोनॉमिक टाइम्सला या व्यवहाराशी संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये स्मार्टफोन निर्मितीसाठी पीएलआय म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टीव्ह योजनेअंतर्गत सॅमसंग कंपनी काम करणार असल्यामुळे सध्या व्हिएतनाबरोबरच इतर देशांमध्ये सुरु असणारा निर्मिती उद्योग कंपनी भारतामध्येच करण्याची दाट शक्यता आहे. सध्या जगभरामध्ये सर्वाधिक स्मार्टफोन निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चीन खालोखाल व्हिएतनामचा क्रमांक लागतो.

सॅमसंगने हा निर्णय नवीन पीएलआय योजनेअंतर्गत घेतल्याचे या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ सांगतात. भारतामध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या कारखान्याच्या माध्यमातून प्रामुख्याने २०० डॉलरपर्यंत किंमत असणाऱ्या स्मार्टफोनची निर्मिती केली जाईल. ४० बिलीयन डॉलर्सपैकी २५ बिलीयन डॉलर्सचा वाटा हा २०० डॉलर किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा असेल. यापैकी सर्वच फोन हे भारताबाहेर निर्यात केले जातील अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

भारतामध्ये दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना म्हणजेच एएसईएएनचे सदस्य असणाऱ्या देशांमधून होणारी आयात ही सॅमसंगच्या या निर्णयामुळे स्वस्त दरामध्ये उपलब्ध होईल. सॅमसंगने यासंदर्भात आधीपासूनच तयारी करुन ठेवल्याचे चित्र दिसत आहे. भारतातील नोएडा येथे सॅमसंगचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण होणारे फोन हे जगभरात आयात केले जातात.

लडाखमधील चीनबरोबरच्या मागील महिन्यातील संघर्षानंतर भारतात सध्या चीनविरोधी वातावरण तयार झाल्यामुळे आणि अनेकांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्यामुळे त्याचा फटका चिनी स्मार्टफोन कंपन्यांना बसला. सॅमसंगला याचा फायदा झाला असून भारतामधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीमध्ये कंपनीने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सध्या ५० टक्के फोन सॅमसंग व्हिएतनाममध्ये बनवते. त्याचप्रमाणे ब्राझील आणि इंडोनेशियामध्येही सॅमसंगचे प्रकल्प आहेत.

सॅमसंगचा चीनमध्येही मोठा प्रकल्प होता, जो कंपनीने मागील वर्षीच बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या कंपनीने स्वत:चा दक्षिण कोरियामधील उद्योगही इतर ठिकाणी हलवण्याचा विचार सुरु केल्याचे समजते. दक्षिण कोरियामध्ये निर्मितीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याने कंपनी आपल्या मूळ देशामधूनच दुसऱ्या देशामध्ये निर्मिती उद्योग हलवण्याचा विचार करत आहे.