‘बॉयकॉट चीन’ सुरु असतानाच चीनच्या बँकेची ICICI मध्ये 15 कोटींची गुंतवणूक

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनसोबत तणाव निर्माण झाला. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची जोरदार मागणी केली जात आहे. सरकार त्या दृष्टीने पावले देखील उचलता आहे. मात्र बॉयकॉट चीन सुरु असतानाच चीनच्या पिपल्स बँक ऑफ चायनाने आयसीआयसीआयमध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. मागील वर्षी देखील चीनच्या केंद्रीय बँकेने एचडीएफसीमध्ये आपली गुंतवणूक वाढवून 1 टक्के केली होती.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पिपल्स बँक ऑफ चायनाचा  म्युचुअल फंड, विमा कंपन्यांसह त्या 357 संस्थात्म गुंतवणुकदारांमध्ये समावेश आहे ज्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) ऑफरमध्ये 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आयसीआयसीआय बँकेने भांडवल उभारण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे लक्ष्य गेल्या आठवड्यातच पूर्ण झाले आहे.

चीनच्या केंद्रीय बँकेने आयसीआयसीआयमध्ये केवळ 15 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इतर गुंतवणुकदारांमध्ये सिंगापूर सरकार, मॉर्गन इनव्हेस्टमेंट व इतर कंपन्यांचा समावेश आहे.

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेच्या ऐवजी भारतासारख्या दुसऱ्या देशात गुंतवणूक वाढवत आहे. मागील वर्षी या बँकेने एचडीएफसीमधील आपली गुंतवणूक देखील वाढवली होती.