मायक्रोसॉफ्टनंतर आता ही कंपनी टीक-टॉक खरेदी करण्याच्या शर्यतीत

भारताने चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घातल्यानंतर अमेरिका देखील यावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काही अमेरिकन कंपन्या टीक-टॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मायक्रोसॉफ्ट टीक-टॉकचा अमेरिकेतील बिझनेस खरेदी करू शकते अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असून, आता टीक-टॉक खरेदी करण्याच्या शर्यतीत सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे नाव देखील आघाडीवर आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार ओरॅकल टीक-टॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करू शकते. याबाबत कंपनी बाइटडान्सशी चर्चा देखील करत आहे. ही चर्चा सुरुवातीच्याच टप्प्यात आहे. मात्र यामुळे मायक्रोसॉफ्टला अडचणी निर्माण होऊ शकतात.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपुर्वी आदेश जारी करत म्हटले होते की बाइटडान्सने 90 दिवसात आपला व्यवसाय विकावा. यानंतर मायक्रोसॉफ्टने देखील टीक-टॉक खरेदीसाठी चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते. आता ओरॅकलचे नाव चर्चेत आले आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक ऐलिसन हे ट्रम्प यांना अनेकदा पाठिंबा देताना दिसून आलेले आहेत.

दरम्यान, भारताबद्दल सांगायचे तर सरकारने टीक-टॉकवर बंदी घातलेली आहे. मात्र काही रिपोर्ट्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड टीक-टॉकच्या भारतीय व्यवसायात गुंतवणूक करू शकते.