योगी सरकारकडून आणखी एका रेल्वे स्थानकाचे बारसे


लखनौ – उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतलेली नामकरणाची मोहीम अद्याप सुरूच असून आणखी एका रेल्वे स्थानकाचे उत्तर प्रदेश सरकारने नामाकरण केले आहे. वाराणसी जिल्ह्यातील मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस असे करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव योगी सरकारने दिला होता, ज्याला गृहमंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, तसे आदेश सोमवारी काढण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय आध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बनारस शहराचा महत्त्व लक्षात घेऊन घेतला होता.

उत्तर वाराणसी मतदारसंघाचे आमदार रवींद्र जयस्वाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ट्विट करून ही माहिती दिली. त्याचबरोबर मंडुआडीह रेल्वे स्थानकाला बनारस नाव दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, खूप दिवसांपासून नाव बदलण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यासाठी स्थानिकांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह राज्य व केंद्र सरकारशीही पत्रव्यवहार केला होता.