तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट घेणाऱ्या आमिर खानवर कंगनाची आगपाखड


आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी ओळखली जाणारी बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर टीकेचा भडीमार केला आहे. तत्पूर्वी तुर्कीचे राष्ट्रपतींच्या पत्नीला भेटाल्यामुळे आमिर खान सोशल मीडियात ट्रोल होत असतानाच कंगनाने देखील आमिर खानला फैलावर घेतले आहे. तिने त्याच्या एका व्हिडीओवरुन त्याला लक्ष्य केले आहे.

आमिर एका जुन्या मुलाखती दरम्यान मुस्लिम धर्मावर बोलला होता. माझा कल हिंदुत्वाकडे असला तरी माझ्या मुलांना मात्र मी संपूर्ण सक्तीने इस्लाम फॉलो करण्याचा सल्ला देतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही आपआपल्या पद्धतीने जगतो. आम्ही दोघेही एकमेकांवर आमचे धर्म लादत नाही. पण मुस्लिम धर्म माझ्या मुलांनी फॉलो करावा, हे मी नेहमी स्पष्टपणे सांगितले असल्याचे आमिर या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाला होता. नेमक्या त्याच्या याच मुलाखतीवरून कंगनाने त्याला लक्ष्य करत ट्विट केले आहे.

हिंदू + मुस्लिम = मुस्लिम, हा तर कट्टरवाद आहे. दोन वेगवेगळ्या धर्मात लग्न करण्याचा अर्थ हा होत नाही की जीन्स आणि रितीरिवाजांचे मिलन होईल. दुस-या धर्माच्या व्यक्तिसोबत लग्न करण्याचा अर्थ खरे तर दोन धर्मांचे मिलन असा होता. अल्लाहची इबादतही मुलांना शिकवा त्याचबरोबर श्रीकृष्णाची भक्ती देखील शिकवा, तुमची हीच धर्मनिरपेक्षता आहे ना?, असे एका ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे.

तर एका अन्य ट्विटमध्ये हिंदू आईची मुले ज्यांच्या नसांमध्ये श्रीकृष्ण, श्रीरामाचे रक्त वाहते. सनातन धर्म, भारतीय संस्कृतीचा ज्यांना वारसा लाभला आहे, त्या हिंदू आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांनी केवळ आणि केवळ इस्लाम धर्म का फॉलो करावा? असे का? असा सवाल विचारला आहे.