ईशांत शर्मासह 29 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय क्रिकेटपटू ईशांत शर्मासह 29 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी क्रिडा मंत्रालयाच्या पुरस्कार निवड समितीतर्फे शिफारस करण्यात आली आहे. तीरंदाज अतनू दास, महिला हॉकीपटू दीपिका ठाकूर, क्रिकेटर दिपक हुड्डा आणि टेनिसपटू दिविज शरण यांचा देखील या यादीत समावेश आहे.

31 वर्षीय ईशांत शर्माने आतापर्यंत भारताकडून 97 कसोटी सामने आणि 80 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत.

आज तकच्या वृत्तानुसार ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक मलिक आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे नाव देखील समितीने या पुरस्कारासाठी सुचवले आहे. मात्र अंतिम निर्णय क्रिडामंत्री किरण रिजिजू यांच्यावर सोडण्यात आला आहे. कारण या दोन्ही खेळाडूंना आधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

साक्षीने 2016 साली रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर मीराबाई चानूला वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी 2018 मध्ये विराट कोहलीसह खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दरम्यान, क्रिकेटपटू रोहित शर्मा, आशियाई सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगवेलू यांच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी समितीने शिफारस केली आहे.