गणेशाचा आवडता मोदक व त्याचे वाहन उंदीर


शिवमानस पूजेत गणेश हा ॐ कार प्रणव आहे. ॐ कार म्हणजे एकाक्षर ब्रह्म. या अक्षराचा वरचा भाग हे गणेशाचे मस्तक आहे, खालचा भाग म्हणजे उदर आहे, चंद्रबिदू म्हणजे लाडू आहे तर मात्रा म्हणजे सोंड आहे. गणेशाचे वाहन उंदीर आहे. त्यामागेही एक कथा आहे. प्राचीन काळी महामेरू पर्वतावर सौभरी ऋषी त्यांच्या अतिशय सुंदर पत्नीसोबत राहात होते. ते बाहेर गेले असताना कौंच नावाच्या एका गंधर्वाने ऋषीपत्नीचा हात धरला तेवढ्यात ऋषी परतले व त्यांनी गंधर्वाला उंदीर होशील असा शाप दिला. त्याने ऋषींची क्षमा मागितली तेव्हा उःशाप देताना ऋषींनी सांगितले की द्वापार युगात महर्षि पराशर गणपती म्हणून प्रकट होतील तेव्हा तू त्याचे वाहन म्हणून राहशील.

गणपतीला मोदक आवडतात. मोद म्हणजे आनंद व क म्हणजे छोटा भाग मोदक म्हणजे आनंदाचा छोटा भाग. त्याचा आकार नारळासारखा आहे. म्हणजेच हा आकार ख या ब्रह्मरंध्रासारखा आहे. कुंडलीनी ख पर्यंत पाहोचली की आनंदाची अनुभूती येते. गणेशाच्या हातातला मोदक त्याची आनंद देण्याची शक्ती दर्शवितो.

गणपतीची सोंड डावीकडे की उजवीकडे यावरूनही अनेक वाद आहेत. सोंड ही दुष्टशक्तींना पळवून लावणारी आहे. सुख समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर उजव्या सोंडेचा गणपती पुजावा असे सांगितले जाते. मात्र या गणपतीचे सोवळे फार कडक असते. शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर डाव्या सोंडेचा गणपती पुजावा.

गणपतीचे कान खूपच मोठे आहेत. त्याचा असा अर्थ आहे की जे जे कानावर पडेल ते सारे ऐकून घ्या मात्र कृती करताना मनाचा निर्णय घ्या. गणेशाचे छोटे डोळे हे सूक्ष्म तीक्ष्ण दृष्टीचे प्रतीक आहेत. गणेशाचा एक दात अखंड आहे तर दुसरा तुटका आहे. अखंड दात हे श्रद्देचे प्रतीक आहे तर तुटका दात बुद्धीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असाही आहे की बुद्धी भ्रमित झाली तरी श्रद्धा ढळता कामा नये.

Leave a Comment