ड्रीम-11 ने मारली बाजी, 222 कोटींमध्ये मिळाली आयपीएलची स्पॉन्सरशिप

चीनी कंपनी व्हिवो या वर्षीच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपवरून मागे हटल्यानंतर बीसीसीआय भारतातील स्पॉन्सर शोधत होते. आता मोबाईल फँटेंसी लीगसाठी प्रसिद्ध असलेल्या ड्रीम इलेव्हनने (Dream11) अनेक कंपन्यांना मागे टाकत आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.

ड्रीम-11 ने हे अधिकार सर्वाधिक 222 कोटी रुपयांची बोली लावत मिळवले. बीसीसीआयने व्हिवोची स्पॉन्सरशिप रद्द करत नवीन स्पॉन्सरशिपसाठी अर्ज मागवले होते.

टाटा समूह, ड्रीम-11, पतंजली आणि बइजू अशा दिग्गज कंपन्यांनी यंदाच्या आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनण्यासाठी बोली लावली होती. मात्र ड्रीम-11 ने सर्वाधिक बोली लावत यात बाजी मारली. अनेकांना वाटत होते की टाटा समूहाला स्पॉन्सरशिपचे अधिकार मिळतील. मात्र ड्रीम-11 ने सर्वांना मागे टाकत अधिकार मिळवले.

दरम्यान, 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये यूएईमध्ये यंदा आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे.