चीनमध्येच होत आहे जिनपिंग यांचा विरोध, आपल्याच देशाला बर्बाद करण्याचा आरोप

कोरोना व्हायरसमुळे चीनची स्थिती बिकट झाली आहे. जगभरात ट्रेड वॉर आणि कोरोनामुळे अनेक देश चीनविरोधात उभे राहिले आहेत. यातच आता चीनच्या प्रमुख राजकीय शाळेच्या एका प्रोफेसरने राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये लोकशाही राजकारणाच्या प्रोफेसर राहिलेल्या काई शिआ यांनी सांगितले की आता आपल्याच पक्षाच्या अंतर्गत जिनपिंग यांचा मोठा विरोध होत आहे.

काई शिआ या द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शी जिनपिंग यांच्यावर आरोप करत म्हणाल्या की, ते आपल्याच देशाला बर्बाद करत आहे. ते चीनला विनाशाकडे घेऊन जात आहेत. चीनच्या सत्तेत असलेले कम्युनिस्ट पक्षाचे लोक देखील बाहेर पडू इच्छित आहेत.

याआधी एक ऑडिओ लीक झाल्यानंतर शिआ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ऑडिओमध्ये कथितरित्या जिनपिंग यांच्यावर टीका करण्यात आली होती. चीनच्या सेंट्रल पार्टी स्कूलने सांगितले की, काई शिआ 1992 पासून प्रोफेसर होत्या. त्यांच्या विधानाने देशाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचले. तर शिआ यांनी पक्षातून काढल्याने आनंदच झाला असल्याचे म्हटले आहे.

जिपिंग चीनला जगाच्या विरोधात का उभे करत आहेत ? असा प्रश्न विचारला असता शिआ म्हणाल्या की, जिनपिंग यांच्या शासनाच्या काळात चीनचा कम्युनिस्ट पक्ष विकासासाठी काम करत नाही. तर विकासात अडथळे आणत आहे. मला वाटते की पक्षातून बाहेर पडण्याची इच्छा असणारी मी एकटी नाही. चीनला जगाचा शत्रू बनविण्यासाठी त्यांनी जिनपिंग यांनाच दोषी ठरवले. पक्षातील लोक घाबरत असल्याने ते विरोधात बोलत नाही. जिनपिंग यांच्याकडून अनेक चुका झाल्या. मात्र चौकशी करणारेच कोणी नाही, असे त्या म्हणाल्या.