डिसेंबरमध्ये बाजारात येणार कोरोनाची लस, चीनचा दावा

रशियानंतर आता चीनने डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात येईल असा दावा केला आहे. औषध कंपनी सिनोफार्मद्वारे तयार करण्यात आलेली लस सर्वसामान्यांसाठी डिसेंबरमध्ये बाजारात उपलब्ध असेल. दोन डोससाठी या लसीची किंमत 1000 युआन (जवळपास 10780 रुपये) असेल. बाजारात आल्यानंतर लसीची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

चीनच्या राष्ट्रीय फार्मास्युटिकल ग्रुपचे (सिनोफार्म) चेअरमन लियू जिंगजेन म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पुर्ण झाल्यानंतर याची मार्केटिंग समिक्षा केली जाईल. ही लस चीनच्या सर्व नागरिकांना टोचली जाणार नाही. विद्यार्थी आणि शहरात राहणाऱ्या लोकांनीच याचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे.

बीजिंग आणि वुहानमध्ये सिनोफार्माच्या दोन वेगवेगळ्या लसींवर काम सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जून महिन्यापासून यूएईमध्ये सुरू आहे. लियू यांनी स्वतः यातील एक लस टोचली आहे. ते म्हणाले की, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवले नाहीत. बीजिंगमध्ये लसीचे 12 कोटी डोस बनविण्याची तयारी सुरू आहे. सिनोफार्माच्या संशोधकांचे म्हणणे आहे की दोन्ही ट्रायलमध्ये याचे सुरक्षित आणि प्रतिकारकशक्ती वाढवून अँटीबॉडी जनरेट झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.

दरम्यान, याआधी चीनच्या कॅनिसिनो कंपनीच्या Ad5-nCoV लसीला पेटंट मिळाले असून, कोरोना लसीचे पेटंट मिळवणारी ही पहिली चीनी कंपनी आहे.