फेसबुक वाद : आंखी दास यांच्याविरोधात पत्रकाराने दाखल केली तक्रार

द वॉल स्ट्रीट जर्नलने भारतात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या धोरणाबद्दल धक्कादायक खुलासा करत, द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचा दावा केला होता. या वृत्तामुळे फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास या चर्चेत आल्या होत्या. या वृत्तानंतर आंखी दास यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार केली होती. ही तक्रार त्यांनी पत्रकार आवेश तिवारी यांच्यासह 5 जणांविरोधात केली होती.

आता पत्रकार आवेश तिवारी यांनी छत्तीसगडच्या रायपूर येथे फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आंखी दास यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तिवारी हे छत्तीसगडमधील न्यूज चॅनेल स्वराजचे स्टेट हेड आहेत. त्यांनी माहिती दिली की, फेसबुकवर वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीवर टिप्पणी करणारी एक पोस्ट लिहिली होती ज्यानंतर जीवे मारण्याच्या आणि जाळून टाकण्याची धमकी मिळत आहे. अज्ञात नंबरवर अनेक कॉल आले आहेत, ज्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे.

द प्रिंटच्या वृत्तानुसार तिवारी म्हणाले की, माझी आंखी दास यांच्याशी काहीही ओळख नाही. त्यांच्याशी कधी बोलणेही झाले नाही. त्यामुळे मला समजत नाही की त्यांच्या तक्रारीत माझे नाव कसे ? ही आश्चर्याची गोष्ट आहे. मी जे फेसबुकवर लिहिले होते ते वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताबाबत होते. त्यांच्यावर व्यक्तिगत काहीही बोललो नव्हतो.