मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांना काय कळते, मी नेहमी कंपाऊंडरकडून औषध घेतो, असे वक्तव्य केल्यामुळे राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. पण संजय राऊत हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना, मी डॉक्टरांचा कोणत्याही प्रकारे अपमान केलेला नाही. डॉक्टरांकडून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेबद्दलचे माझे वक्तव्य होते. मी डॉक्टरांचा अपमान होईल, असे कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे. यावरून आता राऊत यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे.
शिववडापाव, थाळीनंतर आता येणार शिवदवाखाने; डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर तपासणार, भाजपचा टोला
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांना शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने.. येथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, असे ट्विट करत टोला हाणला आहे. संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळते. मी त्यांच्याचकडून औषधे घेतो, असे म्हटले होते. राऊत यांच्या विधानावर अनेकांनी टीका केली आहे.