नक्षलग्रस्त दंतेवाडातील प्राचीन गणेशमूर्ती


छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील ढोलका पहाडावर असलेली अतिभव्य प्राचीन गणेश मूर्ती शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सहा फूट उंचीची ही मूर्ती दगडात कोरली गेली असून ती ३ हजार फूट उंचीवरच्या पहाडावर बसविली गेली आहे. ही मूर्ती किमान ११०० वर्षांपूर्वीची असावी असा मूर्तीतज्ञांचा अंदाज आहे.

१० व्या शतकात ही मूर्ती नागवंशीयांनी रक्षक देवता म्हणून स्थापली असावी असे सांगितले जाते. ग्रॅनाईटमध्ये ही मूर्ती कोरली गेली आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात नागवंशीयांचे संरक्षणाचे साधन फरशी आहे. यामुळेच ही रक्षक देवता असावी असे सांगितले जाते. वरच्या डाव्या हातात तुटलेला दात, खालच्या उजव्या हातात अभयमुद्रेत पकडलेली अक्षमाळ तर खालच्या डाव्या हातात मोदक आहे. बस्तर क्षेत्रात अशी मूर्ती कोठेही नाही असेही जाणकार सांगतात. गणेशाच्या पोटावर असलेली नागप्रतिमा ही नागवंशीयांचे चिन्ह आहे. त्यामुळेच ही मूर्ती नागवंशीयांनी स्थापित केलेली असावी असे सांगितले जाते.

या मूर्तीपर्यंत जाण्याचा मार्ग अतिशय खडतर आहे. दगडधोंड्यातून मार्ग काढत खूप उंचावर चढून जावे लागते.मात्र एकदा वर पोहोचल्यानंतर सभोवार दिसणारी घनदाट जंगले आणि पहाड चढून गेल्याचा शीण क्षणात घालवितात आणि मूर्तींच्या प्रमाणबद्ध आणि प्रसन्न दर्शनाने मनावरही प्रसन्नता पसरते असा अनुभव सांगितला जातो.

Leave a Comment