रोहित शर्मासह चौघांचा होणार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मान


टीम इंडिया धाडक फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्मासह आशियाई सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगवेलू यांचा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मान होणार आहे. यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांच्यासह 12 सदस्यीय पुरस्कार निवड समितीने या चौघांच्या नावाची शिफारस केली आहे.

रोहित शर्मा हा खेलरत्न पुरस्कार जिंकणारा चौथा क्रिकेटपटू आहे. सर्वप्रथम हा मान 1998मध्ये सचिन तेंडुलकरने पटकावला होता, त्यानंतर 2007मध्ये महेंद्रसिंग धोनीला, त्यानंतर 2018मध्ये या पुरस्काराने विराट कोहलीला गौरविण्यात आले होते. 2019ची विश्वचषक स्पर्धा रोहितने गाजवली होती. या स्पर्धेत त्याने पाच शतकांसह 648 धावा केल्या होत्या. आतापर्यंत रोहितने 32 कसोटी, 224 एकदिवसीय आणि 108 टी-20 सामन्यांत अनुक्रमे 2141, 9115 आणि 2773 धावा केल्या आहेत.

तर 2018च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत विनेशने सुवर्ण, तर 2019च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसपटू मनिका बात्रानेही दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. तर 2016च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत थंगावेलूने उंच उडीत सुवर्णपदक जिंकले होते.