शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, आपचा गंभीर आरोप

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीच्या शाहीन बाग येथे जोरदार आंदोलन करण्यात आले होते. सीएए विरोधातील आंदोलनामुळे शाहीन बाग, या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि कार्यकर्ते चर्चेत आले होते. मात्र सीएएच्या विरोधात निदर्शन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शहजाद अली आणि डॉ. मोहरीन हे कार्यकर्ते शाहीन बागच्या आंदोलनात सहभागी होते. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले असून, आम आदमी पक्षाने भाजपवर आरोप केले आहेत. आपने म्हटले आहे की, भाजपने दिल्ली पोलिसांसोबत मिळून राजकीय फायद्यासाठी शाहीन बाग येथे आंदोलन करण्यास सांगितले.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार. आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, दिल्ली पोलीस जाणूनबुजून शाहीन बाग येथे आंदोलन करवत होते. शाहीन बागचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणाला झाला ? भाजपने दिल्ली निवडणूक शाहीन बागच्या नावावर लढली. भाजपने विचारपुर्वक रणनितीद्वारे शाहीन बागच्या नावावर निवडून लढवली.

त्यांनी आरोप केला की, शाहीन बागचे प्रदर्शन हे भाजपनेच करायला लावले. हिंदू-मुस्लिमांमध्ये भाजपने अंतर निर्माण केले. शाहीन बागचे नाव पुढे करत दिल्लीत दंगल घडवली.