SBIचा आपल्या कोट्यावधी ग्राहकांना झटका; ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये केले मोठे बदल


नवी दिल्ली – सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये स्टेट बँकेने मोठा बदल केला असून त्यानुसार यापुढे मोफत व्यवहारांची मुदत संपल्यानंतर पुन्हा रक्कम काढल्यास शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या खात्यात पुरेसे पैसे उपलब्ध नसतील आणि तुमचा एटीएम व्यवहार अपयशी ठरला, तरी शुल्क आकारले जाणार आहे.

मेट्रो शहरांमध्ये एका एटीएम कार्डाद्वारे महिन्याला स्टेट बँक ऑफ इंडिया 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत. पण त्यानंतरच्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे. एसबीआयच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढण्याच्या नियमांनुसार ५ वेळा स्टेट बँकेच्या एटीएममधून आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येतात. ही सुविधा मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु आणि हैदराबाद या मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध आहे.

त्याचबरोबर गैर मेट्रो शहरांमध्ये म्हणजेच ग्रामीण भागातील बँकेचे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा एसबीआय एटीएममधून, तर 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही मर्यादा संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करू शकते.

त्याचबरोबर एसबीआयच्या दुसऱ्या नियमानुसार, एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत आणि तेवढे पैसे खात्यात नसतील तर तुमच्या प्रत्येक अपयशी व्यवहारावर 20 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे आधी बॅलन्सची माहिती घेऊनच पैसे काढावे लागणार आहेत. त्याचबरोबर यापुढे खातेधारकाला जर एटीएममधून 10000 पेक्षा जास्त रक्कम काढायची, असेल तर त्याच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठविला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविण्यात येणार नाही.