पुणे शहर बनले देशातील नवा ‘कोरोना हॉटस्पॉट’


पुणे – देशात महाराष्ट्र हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्याची राजधानी असलेले मुंबई शहर हे कोरोनाचे केंद्र स्थान असल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता आश्चर्याची बाब अशी की कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मुंबईला पछाडत आता महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर रविवारी देशातील नवे कोरोनाचे केंद्र बनले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरात होत असल्यामुळे पुणे शहर मुंबईला मागे टाकत देशातील नवे ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनले आहे.

महाराष्ट्राने कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीत दक्षिण अफ्रिकेलाही मागे टाकले असून या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५,९५,८६५ एवढी आहे. तर जागतिक आकडेवारीनुसार, कोरोनाबाधित देशांच्या यादीत दक्षिण अफ्रिका पाचव्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी अमेरिका (५५,६६,६३२), दुसऱ्या स्थानी ब्राझिल (३३,४०,१९७), तिसऱ्या स्थानी भारत (२६,४७,३१६) आणि चौथ्या स्थानी रशिया (९,२२,८५३) हे देश दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणात मुंबई शहर हे अद्यापही आघाडीवर असल्याबाबतचे वृत्त टाइम्सनाऊ या वृत्त वाहिनीने दिले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मागील चार दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाचे ३०० पेक्षा कमी मृतांची संख्या झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांचा आकडा २०,०३७ एवढी झाला आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत राज्यात ५,९५,८६५ इतके बाधित लोक आहेत. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६९.८२ टक्के आहे. तर मृत्यूदर ३.३६ एवढा आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलेल्यांची संख्या ४,१७,१२४ एवढी आहे. ही संख्या अॅक्टिव्ह केसेस १,५८,३९५ पेक्षा जास्त आहे.