नोबेल विजेत्या वैज्ञानिकाने व्यक्त केली रशियाच्या लसीबाबत चिंता

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी मागील आठवड्यात कोरोन व्हायरसच्या लसीला अधिकृत परवानगी दिली होती. रशियाने या लसीचे उत्पादन देखील सुरू केले आहे. मात्र असे असले तरी या लसीच्या सुरक्षितते बाबत अद्याप चिंता कायम आहे. नोबेल पुरस्कार विजेते ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक पीटर डोहर्टी यांनी देखील आता या लसीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पीटर डोहर्टी म्हणाले की, मोठी चिंता ही आहे की लसीच्या सुरक्षिततेबाबत जी चिंता व्यक्त केली जात आहे, ती खरी ठरल्यास अन्य लसींच्या विश्वसनीयतेवर देखील त्याचा परिणाम पाहण्यास मिळेल. रशियाच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल व्यापक प्रमाणात झालेले नाही.

डोहर्टी म्हणाले की, कमी किंमतीचे औषध आणि लसीचे निर्माण करण्यामध्ये भारताची यशस्वी पार्श्वभूमी पाहता आम्हाला आशा आहे की भारत यात मोठी भूमिका पार पाडेल. अखेर, जागतिक आर्थिक हालचाली पुन्हा रुळावर आणण्याचे हे सर्वात वेगवान साधन आहे.

ते म्हणाले की, रशिया अजून एक क्लिनिकल ट्रायलच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे याचा परिणाम काय होतो, हे पाहणे अद्याप बाकी आहे. लसीऐवजी कोरोनावरील औषध शोधण्याची गरज आहे का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लस अधिक प्रमाणात स्वस्त व त्वरित उपलब्ध करता येणारी गोष्ट आहे. मात्र असे न झाल्यास लोकांच्या उपचारासाठी आपल्या अनेक विशेष अँटीव्हायरस औषधांची गरज असेल.