NEET आणि JEE च्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार – सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षांसंदर्भात महत्वपूर्ण सुनावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली असून ठरलेल्य वेळापत्रकानुसारच NEET आणि JEE परीक्षा होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

या परीक्षा सप्टेंबर महिन्यात नियोजित असून या परीक्षा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात 6 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. ही याचिका 11 विविध राज्यांमधील 11 विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर आपण संकटात टाकत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याची नोंद खंडपीठाने घेतली. यावेळी न्यायालयाने आम्ही धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करु शकत नसल्याचे सांगितले. परीक्षा झाली नाही तर देशाचे नुकसान होणार नाही का? असा सवाल विचारत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल असे न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी म्हटले.

परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले. 3 जुलै रोजी परीक्षेच्या तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केल्या. हे प्रसिद्धी पत्रक रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. देशभरात कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन करण्यास केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे, त्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करू नये अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.