अखेर Zee 5 चा ‘अभय 2’ मधील ‘त्या’ फोटोप्रकरणी माफीनामा


शहिद जवान खुदीराम बोस यांचा फोटो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या अभय 2 या वेबसीरिजमध्ये गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकावर लावण्यात आल्यामुळे नेटकरी भलतेच संतापले होते. त्या परिणाम स्वरुप #BoycottZee5 हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीरिजेच दिग्दर्शक आणि झी5 ने याप्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे.

या प्रकरणी ट्विट करत झी 5 ने जाहीरपणे माफी मागितली आहे. पण तरीदेखील नेटकऱ्यांचा संताप कमी न झाल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही घडलेल्या प्रकाराविषयी माफी मागतो. आमचा, शोचे निर्माते आणि शो यांचा कोणाच्या भावना दुखावण्याचा कोणताच हेतू नव्हता. अभय 2 मध्ये दाखविण्यात आलेला त्या दृश्यातील फोटो आम्ही धुसर (ब्लर) केला असल्याचे ट्विट झी 5ने केले आहे.

झी5 च्या माफीनाम्यानंतरही नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी फोटो ब्लर करुन चालणार नाही, तर तो फोटो पूर्णपणे डिलीट करा अशी मागणी केली आहे. दरम्यान, कुणाल खेमू या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असून राम कपूर हे गुन्हेगाराच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सीरिजमधील एका सीनमध्ये गुन्हेगारांचे फोटो असलेल्या फलकावर चक्क शहिद जवान खुदीराम बोस यांचा फोटो लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. हा फोटो नेटकऱ्यांच्या नजरेत आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली असून ट्विटरवर #BoycottZee5 या मागणीने जोर धरल्याचे दिसून येत आहे.