अखेर रितेशनेच दिली निशिकांत कामत यांच्या निधनाची माहिती


प्रख्यात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त बऱ्याच माध्यमांनी प्रसारित आणि प्रकाशित केल्यानंतर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयाने ते वृत्त फेटाळले होते. दुपारी एकच्या सुमारास रुग्णालयाने निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन जारी केले होते. सध्या निशिकांत कामत व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले होते. त्यातच अभिनेता रितेश देशमुखने यानंतर एक ट्विट करत निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर अजून ते जिवंत असून मृत्युशी लढत असल्याचे सांगितले होते. पण आता रितेशनेच त्यांच्या निधनाची माहिती देणारे एक ट्विट केले असून, त्यानुसार निशिकांत कामत यांचे निधन झाले आहे.

हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरू होते. निशिकांत कामत यांना काविळ झाली होती, त्याचबरोबर त्यांना क्रोनिक लीव्हर डीसिज होता, असं एआयजी हॉस्पिटलने सांगितले होते. त्यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखने याबाबत ट्विट करत निशिकांत तुला मी नेहमीच मिस करेन मित्रा, असे म्हटले आहे.

बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी निशिकांत कामत हे एक नाव होते. यात अजय देवगणचा ‘दृश्यम’, इरफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. डोंबिवली फास्ट आणि लय भारी या मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपले नशिब आजमावले होते. मराठी चित्रपट सातच्या आत घरात आणि भावेश जोशी या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्याचबरोबर रॉकी हँडसम चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.