निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त रुग्णालयाने फेटाळले


प्रख्यात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त बऱ्याच माध्यमांनी प्रसारित आणि प्रकाशित केल्यानंतर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयाने ते वृत्त फेटाळले असून दुपारी एकच्या सुमारास रुग्णालयाने निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. सध्या निशिकांत कामत व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

बऱ्याच प्रसारमाध्यमांनी दुपारी बारा-सव्वा बाराच्या सुमारास निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त दिले होते. त्यानंतर सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी निशिकांत कामत यांच्याबाबत ट्विट केले. पण अभिनेता रितेश देशमुखने यानंतर एक ट्विट करत निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर अजून ते जिवंत असून मृत्युशी लढत असल्याचे सांगितले. यानंतर मग निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करुन या संभ्रमावर पडदा पाडला. निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाने आपल्या मेडिकल बुलेटिनमध्ये नमूद केले आहे.

रुग्णालयात त्यांच्यावर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हॅपेटोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागारांची टीम उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून आधी सांगण्यात आले होते. पण निशिकांत यांना झालेल्या आजारावर कोणतेही उपचार नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी निशिकांत कामत हे एक नाव आहे. यात अजय देवगणचा ‘दृश्यम’, इरफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. डोंबिवली फास्ट आणि लय भारी या मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपले नशिब आजमावले होते. मराठी चित्रपट सातच्या आत घरात आणि भावेश जोशी या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्याचबरोबर रॉकी हँडसम चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.