‘धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड कधीच मोडणार नाही’, गौतम गंभीरने लावली पैज

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तर त्याच्या नावावर असे अनेक विक्रम अद्यापही आहेत, जे तोडणे अवघड आहे. धोनीच्या अशाच एका विक्रमाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने माहिती दिली आहे. सोबतच हा विक्रम कोणीही मोडू शकणार नाही, याबाबत पैज देखील लावली आहे.

स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना गंभीरने सांगितले की, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या. मला वाटत नाही की धोनीचा हा विक्रम कोणी मोडू शकेल. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी20 वर्ल्ड कप, 2011 चा एकदिवसीय वर्ल्ड कप आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. धोनी असा करणारा एकमेव कर्णधार आहे.

गंभीर म्हणाला की, धोनीने असे केले आहे जे कायम राहणार आहे. मला वाटते की 100 शतकांचा विक्रम एकवेळेस मोडेल. रोहित शर्माचा दुहेरी शतकांचा विक्रम देखील मोडेल. मात्र असा भारतीय कर्णधार भारतीय संघात येणार नाही जो आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकू शकेल. धोनीचा हा रेकॉर्ड कायम राहणार आहे, मी यावर पैज लावू शकतो.

दरम्यान, 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. त्याच्यानंतर काही मिनिटातच क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील धोनीसोबत जाण्याचा निर्णय घेत निवृत्ती जाहीर केली होती. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मात्र खेळताना दिसतील.