कोरोनाबाधित असूनही निलेश राणेंचा संजय राऊत यांच्यावर आक्रमक शब्दांत हल्ला


मुंबई : शिवसेनेविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत आले असून त्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना विरोधाला राणे यांच्याकडून आणखी कडक टीका केली जाऊ लागली आहे. निलेश राणे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला, असला तरीही ट्विटरच्या माध्यमातून ते सेना नेत्यांना लक्ष्य करायला विसरले नाहीत.

‘सामना’च्या रोखठोक या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. तिकडे रशियाने कोरोनाची लस काढली. जागतिक आरोग्य संघटनेलाही विचारले नाही. पण आम्ही आमच्याच मस्तीत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. भाजपकडून निलेश राणे राऊत यांच्या टीकेवर पलटवार करण्यासाठी पुढे सरसावले.

आपल्या ट्विटर हँडलवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी एकेरी शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. तू दिल्ली बिल्ली सोड आधी एक निवडणूक लढवून दाखव. मुंबई नाही सांभाळता येत…लागला देशाच्या वार्ता करायला, अशा खरमरीत शब्दांमध्ये निलेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणे याआधीही अनेक नेत्यांवर एकेरी शब्दांमध्ये टीका केल्याने चर्चेत आले होते. त्यांनी अनेकदा अशाच शब्दांमध्ये संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, निलेश राणे यांना नुकतीच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असं आवाहन निलेश राणे यांनी केले होते.