दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित जसराज यांचे कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कुटुंबासोबत अमेरिकेतच होते. त्यांची कन्या दुर्गा जसराज यांनी याबाबत माहिती दिली. आपल्या 80 वर्षांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सन्मान मिळवले.

28 जानेवारी 1930 ला हरियाणाच्या हिसार येथे जन्मलेले पंडित जसराज हे मागील 4 पिढ्यांची परंपरा पुढे चालवत होते. त्यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे संगीतज्ञ होते. पंडित जसराज यांनी जसंरगी नावाने एका वेगळ्या चालीच्या जुगलंबदीची देखील रचना केली होती.

सप्टेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने 13 वर्षांपुर्वी शोधलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज असे नाव देत त्यांना सन्मानित केले होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अंटार्कटिकाच्या दक्षिणी ध्रुवावर आपली कला सादर केली होती. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील गौरविण्यात आले होते. याशिवाय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. पंडित जसराज यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.